- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार कुणाला संधी देणार?
- नवोदित कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार
पिंपरी ( प्रतिनिधी):राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार सत्तेत आल्यामुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी किंवा विधान परिषदेवर संधी देण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्याजागी नवोदित कार्यकर्त्याकडे शहर संघटनेची धुरा देण्यात येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पक्षाच्या संघर्षाच्या काळात संजोग वाघेरे यांनी शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. आता राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे वाघेरे यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तसेच, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, स्वीकृत नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते भाउसाहेब भोईर यांच्यासह स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक मयूर कलाटे यांनी विधान परिषदेसाठी 'देव पाण्यात ठेवले आहेत', अशी चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात आहे.
दरम्यान, शहराध्यक्ष वाघेरे यांना बढती दिल्यानंतर शहर संघटनेची धुरा नवोदित कार्यकर्त्याला देण्यात यावी. पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात यावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
महिला शहराध्यक्षही बदलणार?
शहर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या जागी आता नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येईल. त्याबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार विचारविनिमय करीत आहेत. पिंपरीतील नगरसेविका सुलक्षणा धर यांचे नाव शहराध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
आमदार अण्णा बनसोडे निर्णायक भूमिकेत…
राष्ट्रवादीने पिंपरी विधानसभा ताब्यात घेतली. त्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांचे वजन पक्षात वाढले आहे. शहर पातळीवर पक्ष संघटन किंवा कोणत्याही बाबतीन निर्णय घेण्यासाठी बनसोडे निर्णायक भूमिकेत दिसणार आहेत, असे संकेत नेते अजित पवार यांनी दिले आहेत, असेही विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.