पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांची पहिलीच सभा तहकूब झाली आहे. त्यामुळे महापौरांच्या पहिल्याच सभेची सुरूवात तहकुबीने झाली आहे. दरम्यान, मागील अडीच वर्षात सत्ताधारी भाजपने ५० वेळा महासभा तहकूब केल्या आहेत. तोच पायंडा नवीन महापौरांनी देखील सुरु ठेवला आहे. सांगवीचे प्रतिनीधित्व करणाऱ्या माई ढोरे यांची नुकतीच शहराच्या महापौरपदी नियुक्ती झाली आहे. डिसेंबर महिन्याची आज ची सर्वसाधारण सभा ही त्यांची पीठासीन अधिकारी म्हणून पहिलीच सभा होती. मात्र, शहरातील घटनांमध्ये मृत पावलेले नागरिक, सिमेवर लढताना शहिद झालेले जवान, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लाग आदी दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून ही सभा तहकूब करण्यात आली. ६ जानेवारी २०२० पर्यंत ही सभा तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे महापौरांच्या पहिल्याच सभेची सुरूवात तहकूबीने झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती.दरम्यान, सत्ताधारी भाजपच्या मागील अडीच वर्षाच्या राजवटीत सुमारे ५० वेळा सभा तहकूब केली आहे. मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याचे आयुध वापरून तहकूब होणाऱ्या सभांमुळे वेळेच्या अपव्ययाबरोबरच शहर विकासाला प्रतिरोध झाला आहे. नियमित पक्षबैठक, धोरणात्मक निर्णयावर एकमताचा अभाव, सत्ताधाऱ्यांमधील गटबाजी यामुळे सभा तहकुबींची आफत सत्ताधाऱ्यांवर ओढवत असल्याची चर्चा आहे. भाजपच्या सभा तहकुबींच्या तारीख पे तारीख धोरणामुळे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव लालफितीत अडकत आहेत.
महापौरांच्या पहिल्याच सभेची सुरूवात तहकुबीने!