सिलेंडरच्या स्फोटात ६ महिन्याच्या चिमुकलीचा अंत












पुणे: खराडी येथील संभाजी नगरातील एका घरामध्ये झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. या स्फोटात बाळाचे आईवडीलही भाजले आहेत. हा स्फोट आज सकाळी गॅस गळती झाल्यानंतर झाला असून या स्फोटात जखमी झालेले बाळाचे आईवडीलांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. स्वराली भवाळे (सहा महिने) असे या चिमुकलीचे नाव असून शंकर भवाळे (२८) आशाताई शंकर भवाळे (२२) अशी जखमी आईवडिलांची नावे आहेत.


शंकर भवाळे, आशाताई भवाळे सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्या पाणी तावण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. त्या वेळी शंकर भवाळे आणि सहा महिन्याची स्वराली झोपले होते. रात्रभर गॅस गळती झाली होती. तसेच गॅस घरभरही पसरला होता.आशाताई त्यांनी स्वयंपाक घरातील दिव्याचे बटण दाबल्याबरोबर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे चार खोल्यांवरील पत्रे उडाले इतका हा स्फोट शक्तीशाली होता. घरातील स्वयंपाक घराला आग लागली. ही आग हा हा म्हणता घरात पसरली. यात सहा महिन्याचे बाळ आणि त्याचे आईवडील भाजले. तिघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान या सहा महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.


या स्फोटामुळे गॅस शेगडीच्या वर भिंतीवरचे सिमेंट कोसळले आहे. स्फोटात शेगडी पूर्णपणे छिन्नविछिन्न झाली.अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी या घराकडे धाव घेतली.या दुर्घटनेत अवघ्या सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू ओढवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.