महापालिका प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यास प्रारंभ

पिंपरी-चिंचवडमधील सात भाग “सील’



पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराभोवती करोनाचा विळखा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार शनिवारी (11 एप्रिल) रात्री 11 वाजल्यापासून दापोडी, कासारवाडी परिसर “सील’ करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा भाग “सील’ असणार आहे. तसेच शुक्रवारपासून (10 एप्रिल) भोसरीतील काही भाग सील केला आहे.


 

पाच दिवसांपूर्वी खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर सील केला होता. शनिवारपर्यंत पिंपरी-चिंचवडमधील सात भाग “सील’ केले आहेत.


करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा भाग “सील’ केला आहे.


“सील’ करण्यात आलेले परिसर
विनियर्ड चर्च परिसर, दापोडी (माता शितळादेवी चौक – विनियर्ड चर्च- सुखवानी ग्लोरी – पब्लिक फूड शेल्टर – धूम मेन्स पार्लर, पिंपळे गुरव रोड), डायमंड प्लॅस्टिक परिसर कासारवाडी (सिद्धार्थ मोटार कासारवाडी, दत्तमंदिर, भारत गॅस, सीएमई बॉन्ड्री, सिद्धार्थ मोटार, कासारवाडी), चांदणी चौक (पीएमपी चौकाजवळ), भोसरी (पूजा टुर्स अँड ट्रॅव्हल्स, भोसरी मेन रोड, मॉन्जिनी केक शॉप, मेघना सोनोग्राफी सेंटर, लांडेवाडी रोड, महापालिका भोसरी करसंकलन कार्यालय, भगवान गव्हाने चौक, लोंढे गिरणी) हा भागदेखील “सील’ केला आहे. खराळवाडी, दिघी, चिखली (घरकुल), थेरगाव, पडवळनगर परिसर “सील’ केला आहे.