पिंपरी : अवघे जग कोरोनाच्या जागतिक महामारीच्या विळख्यात सापडले आहे. त्याचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार त्याचबरोबर स्थानिक प्रशासन संस्था सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांसाठी अनेक योजना सुरु करीत आहे. या योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पाहोचविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ॲण्टी कोरोना टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या महाराष्ट्र-गोवा अध्यक्ष व राज्यप्रमुखपदी भारती चव्हाण यांची नियुक्ती संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र चौधरी यांनी केली असल्याचे पत्र गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या अध्यक्षा भारती चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
ॲण्टी कोरोना टास्क फोर्स (ACTF) ही स्वायत्त संस्था (Autonoums Body) सामाजिक क्षेत्रात देशभर कार्यरत आहे. देशातील बहूतांश राज्यात कोरोनाविषयी या संस्थेचे सामाजिक कार्य सुरु झाले आहे. ‘एसीटीएफ’चे महाराष्ट्र समन्वयक म्हणून सुरज गायकवाड (अहमदनगर), गोवा समन्वयक महेश राणे (म्हापसा) यांची नियुक्ती एसीटीएफच्या महाराष्ट्र अध्यक्षा भारती चव्हाण यांनी केली आहे. तसेच राज्य सल्लागार म्हणून माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण (पुणे), ज्येष्ठ साहित्यिक डॉ. क्रांती महाजन (अमरावती), विकास पाटील (पर्यावरण तज्ज्ञ, पिंपरी चिंचवड), कामगार नेते हौसी प्रसाद शर्मा (ठाणे) या ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शन करीत आहेत.
त्याचबरोबर धनंजय जगताप (पिंपरी चिंचवड), माऊली सोनवणे (पुणे जिल्हा), संजय गोळे (पुणे शहर), तारा खान (मुंबई उपनगर), अनुप भोसले (नाशिक शहर), विलासराव गोडसे (नाशिक जिल्हा), डॉ. नंदा शिवगुंडे (सोलापूर शहर), रत्नप्रभा पाटील (पंढरपूर), नागेश चौधरी (सातारा जिल्हा ), विष्णू आंब्रे (रत्नागिरी), फारूक डुंगे (जालना), अमोल मावसकर (बुलढाणा), संजय तायडे (जळगाव), संगीता शिंदे (सातारा), अंजली श्रीवास्तव (करमाळा), समरीता पंचभाई (नागपूर), कविता कोळी (धुळे), धनंजय गाळणकर (धुळे जिल्हा) यांची जिल्हा शहर समन्वयक पदी एसीटीएफच्या राज्य प्रमुख भारती चव्हाण यांनी निवड केली आहे.
अशाच पद्धतीने राज्यातील 36 जिल्ह्यात व सर्व तालुक्यात आणि शहरात, गावपातळीवर एक पुरुष व एक स्त्री समन्वयक म्हणून स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. एसीटीएफचे अनेक स्वयंसेवक महाराष्ट्र व गोव्यासह इतर राज्यातही शासकीय यंत्रणेबरोबर खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.
या संस्थेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक खेड्यात गरजू नागरिकांपर्यंत संपर्क साधण्यात येत आहे. त्यांना संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, जेवण, मास्क, वैद्यकीय मदत, सॅनिटायझर, सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच कोरोना रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांसाठी पीपीई किट व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच कोरोना या आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे. देशातील 70 टक्के जनता ग्रामीण व निमशहरी भागात आहे. त्यांच्याशी जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर ग्रामप्रमुखामार्फत समन्वय साधून सरकारच्या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्यात येईल यासाठी ही संस्था कोणत्याही व्यक्ती वा संस्थांकडून मदत, देणगी घेणार नाही. परंतू स्वयंसेवकांमार्फत जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी व त्याचा प्रत्यक्ष गरजू नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी मदत करील. सर्व राज्यात संस्थेचे काम सुरु झाले आहे. लवकरच ॲण्टी कोरोना टास्क फोर्सचा विस्तार महाराष्ट्र व गोवा राज्यात करण्यात येईल. या टास्क फोर्समध्ये ग्राम, तालुका, जिल्हा पातळीवर स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणा-या व्यक्तींनी भारती चव्हाण (9763039999) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.